Pune Festival

केरळोत्सवातील बहारदार कार्यक्रमातून घडले केरळी संस्कृतीचे दर्शन

पुणे- गायन, वादन, नृत्य यांचा मनोहरी संगम असणाऱ्या केरळोत्सवातील बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमांनी केरळ संस्कृतीचे दर्शन घडवीत उपस्थितांचे मने जिंकली. या महोत्सवाला पुण्यातील मल्याळी नागरिकांसह शेकडो पुणेकरांनी हजेरी लावत या महोत्सवाचा आनंद लुटला. प्रसिद्ध नृत्यांगना व अभिनेत्री सुधा चंद्रन हे केरळोत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरले.त्यांनी सादर केलेल्या गणेश वंदना व ‘दशावतारम’ या नृत्याने उपस्थितांच्या डोळ्यांची पारणे फिटली.

पुणे फेस्टिवल अंतर्गत पुणे मल्याळी फेडरेशनच्यावतीने बालगंधर्व रंगमंदिर येथे ‘केरळोत्सवाचे’ आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी ,प्रसिध्द अभिनेत्री व नृत्यांगना सुधाचंद्रन यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. पुणे फेस्टिव्हलचे मुख्य संयोजक कृष्णकांत कुदळे, फेडरेशनचे अध्यक्ष राजन नायर, फेडरेशनचे उपाध्यक्ष एम. एन. विजयन, सचिव जॉर्ज इब्राहीम, सहसचिव अॅड. विजयकुमार, पिंपरी-चिंचवडचे माजी नगरसेवक बाबू नायर, पी.पी. नायर, पुणे केरळ महोत्सवाचे अध्यक्ष मधू नायर, पाषाण समाजाचे अध्यक्ष के. जे. पिल्ले, संतोषकुमार, राजेश पुदुवाड आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

गणेश वंदनाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रसिद्ध नृत्यांगना व अभिनेत्री सुधा चंद्रन यांनी लक्षणा डान्स अकॅडमीच्या ३० कलाकारांबरोबर सुमारे २५ मिनिटे गणेश वंदना व ‘दशावतारम’ या नृत्याचे सादरीकरण केले. केरळच्या पारंपारिक वेशभूषेत, स्री शक्तीचा जागर करणारा व हिंदू धर्माची महानता सांगणाऱ्या ‘थिरुवाथीरा कली’ या कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली. ख्रिश्चन समाजाची महानता दर्शविणारे आणि सेंट थॉमस यांच्या जीवनावरील व केरळमधील कार्यावर आधारित ‘मारगम कली’, केरळातील मुस्लीम समाजाचे दर्शन घडविणारा ‘ओपन्ना’, केरळातील देवदासींनी सादर केलेला ‘दासीआत्तम’, या कार्यक्रमांच्या सादरीकरणाने राष्ट्रीय एकात्मता व सर्वधर्म समभावाचे दर्शन घडवीत उपस्थितांची मने जिंकली. याशिवाय सर्व वयोगटातील मुलामुलींनी सादर केलेले ‘लावणी बॅलेट’, ‘हिप हॉप डान्स’, ‘सिनेमॅटीक डान्स’, ‘ब्रेक डान्स’ने उपस्थितांची वाहवा मिळवली.

उद्घाटनपर भाषण करताना पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी म्हणाले, एखादा महोत्सव सुरु करणे खूप सोपा असतो. मात्र, तो अखंडपणे सुरु ठेवणे हे अवघड काम असते. पुणे फेस्टिव्हलने मागच्यावर्षीच यशस्वी रौप्यमहोत्सवी वर्ष पूर्ण केले आहे. यंदाचे महोत्सवाचे २६वे वर्ष असून आम्ही हा महोत्सव पुढील २५ वर्षे अखंडपणे कसा यशस्वी होईल याचे नियोजन आता करत आहोत. केरळी समाजाचे पुण्याच्या विकासात मोठे योगदान असून गेली अनेक वर्ष पुणे फेस्टिव्हलचा ‘केरळ महोत्सव’ हा प्रमुख घटक झाला आहे याचा आपल्याला अभिमान आहे असे त्यांनी नमूद केले.

कृष्णकांत कुदळे म्हणाले, पुणे फेस्टिव्हलने पुण्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात सांस्कृतिक वातावरण तयार केले आहे. पुणे फेस्टिव्हलनंतर महाराष्ट्रात अनेकठिकाणी अशा प्रकारचे सांस्कृतिक महोत्सव सुरु झाले आहेत. पुणे फेस्टिव्हलचे व केरळ महोत्सवाचे एक वेगळे नाते निर्माण झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजन नायर यांनी केले.

आपला स्नेहांकित

प्रवीण प्र. वाळिंबे

मीडिया को-ओर्डीनेटर

९८२२४५४२३४ / ९४०३०४५८५८

Post Comment